आईचे लेख
Monday, 22 June 2020
वेळा
Wednesday, 17 June 2020
नमस्कार !
दसरा, दिवाळी, गुढी-पाडवा, आपला स्वतःचा वाढदिवस, परीक्षेला जाताना तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना आणि अशाच काही महत्वाच्या गोष्टी करतांना आपण देवाला व घरातील वडीलधाऱ्या माणसांना आठवणीने नमस्कार करतो अन त्यावेळी घरातील आजी, आई, काका, वहिनी कोणीही आपल्या हातावर आवर्जून दही देतात. सगळं कसं छान आहे नं अगदी ! नमस्कार करणारा अगदी प्रसन्न मनाने आनंदात आपल्या कामाला जातो.
शास्त्र सांगते, नमस्कार लहानांनी मोठ्यांना करावा. आई, वडील, गुरु, अतिथी यांना तर देव समजून नमस्कार करावा. साधू-संतांना तर लहान-मोठे कुणीही असो सर्वांनीच नमस्कार करावा. मग ते साधू संत आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी सुद्धा... आपला तो नमस्कार असतो, प्रपंचातील सर्व ऐहिक सुखाला तुच्छ मानून त्याकडे पाठ फिरविलेल्या त्यांच्या अपूर्व त्यागाला. सर्वांमध्येच देव आहे असे समजून प्रत्येकाचे कल्याण करणाऱ्या, त्यांच्यामध्ये सदैव जागृत असलेल्या त्यांच्या सत्प्रवृत्तीला...
श्रीमदभगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी प्रिय ना कोणी अप्रिय - तेव्हा अध्यात्म व परमार्थाचं म्हणणं आहे - प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंतःकरणात भगवंतांचा वास असतो तेव्हा नमस्कार कुणीही कुणालाही करावा.
मात्र विज्ञान कितीही पुढे गेले तरी जन्ममरणाची दोरी आपल्याच हातात ठेवणाऱ्या अदृश्य शक्तीला म्हणजेच परमेश्वराला (मग त्याला तुम्ही देव, निसर्ग , नियती , विश्वचक्र काहीही म्हणा) मात्र साधुसंतांसह सर्वांनीच नमस्कार करावा. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. त्याची मनापासून प्रार्थना करावी.
नमस्कारात जबरदस्त ताकद असते. आपण मनातल्या मनात नमस्कार केला तरी नमस्काराचा परिणाम आशीर्वादच असतो. तो कोणालाही केलेला असला तरी, कर्तव्य म्हणून केला तरी, नुसता उपचार म्हणून केला तरी किंवा नाईलाज म्हणून अनिच्छेने केला तरी, ज्याला नमस्कार केला ती व्यक्ती वा शक्ती आशीर्वादच देते. अगदी तिच्याही नकळत तथास्तु !
श्रीमंत सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९
(कृपया लेखावर कमेंट करतांना शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा हि विनंती )
Saturday, 13 June 2020
नातं : मानलेलं
अशोक गेंगाणे माझा भाऊ आहे. पण मानलेला. त्याला मानलेला भाऊ का म्हणावं ? हेच मला समजत नाही. पण ह्या जन्मी तो माझा मानलेलाच भाऊ आहे. पुनर्जन्म आहे कि नाही मला माहित नाही आणि असलाच तर पुन्हा माणसाचाच जन्म मिळावा इतके आपण भाग्यवानही नाही; पण का कोणास ठाऊक तरीही मला असंच वाटतं कि, गेल्या जन्मी माझी आणि अशोकाची आई एकच असावी.
तो नेहमीसारखा येत राहिला. राखी पौर्णिमेला राखी बांधून घ्यायचा. भाऊबीजेला ओवाळून घ्यायचा. शिक्षण झालं. त्याला नोकरीही लागली नंतर त्याच लग्न झालं बायकोही चांगली मिळाली. साधी, सरळ, सुस्वभावी, सगळ्यांशी जमवून घेणारी. तिनंही आमच्या भाऊ-बहीण नात्याचा मन राखला. येणं-जाणं वाढलं. आमच्या घरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांचा आधार असायचा. मदत असायची. एकमेकांच्या घरातील प्रत्येक कार्य प्रसंगात आम्ही आवर्जून सहभागी होत होतो, कार्याचा आनंद घेत होतो. त्याची दोन मुलं त्यांनीही आत्या म्हणून सुखावलं. माझी तीन मुलंही त्यांना तोंड भरून मामा, मामी म्हणून हाक मारतात. माझा भाऊ म्हणून ह्यांनाही अशोकचा सार्थ अभिमान होता.
आता आम्हाला सुना आल्या. दोघांनाही नातवंड झाली अन तरीही आम्हा दोन्ही कुटुंबातील वागणं अगदी तसंच राहिलं, किंबहुना थोडं जास्त जवळच अन जास्तच आपुलकीचं झालं. माझ्या घराच्या कार्यात भाऊ म्हणून व त्याच्या घराच्या कार्यात माहेरवाशीण म्हणून अगदी मानाने वावरते. (फोटो सौजन्य : सौ. ललितागौरी गेंगाणे)
७५१७२८१६३९
अभिनीत : ऑक्टोबर - नोव्हेंबर - २०११ (दिवाळी अंक)
Monday, 8 June 2020
पैसा
असं म्हणतात, सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग कुणालाही, कधीही आणता येत नाही. पैशाशिवाय माणसाला काहीच करता येत नाही. पैशांवाचून सगळ्यांचच अडतं. पैसा माणसाला दहा माणसात बसवतो आणि दहा माणसातून उठवतो सुद्धा ! Thursday, 4 June 2020
मनात आलं लिहिलं : आनंद
समाज एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या ४० जागा भरायच्या आहेत. त्या जागेसाठी १००० पात्र तरुण उमेदवार मुलाखतीसाठी आले आहेत. ठरल्याप्रमाणे ४० तरुणांची नियुक्ती झाली म्हणून उरलेल्या ९६० उमेदवारांचा हक्क, आनंद ह्या ४० उमेदवारांनी हिसकावून घेतला, असे होत नाही. ती त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व होतं. तसंचते त्यांचं नशीबही होतच. नोकरी मिळाल्याचा आनंद स्वच्छ, निखळच असतो.
आपल्याला झालेला आनंद आपण केव्हाही एकदा आपल्या जवळच्या माणसाला सांगतो आणि त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतो असे आपल्याला होऊन जाते. स्वतःच्या बाबतीत घडलेली चांगली गोष्ट अन त्यामुळे आपल्याला झालेला आनंद दुसऱ्याला सांगण्यात कुणाला कमीपणा वाटत असेल असे मला तरी वाटत नाही.
पावसाळा दरवर्षी येतो पण उन्हाने अतिशय तापलेली जमीन पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने ओली होते आणि मातीला जो सुगंध येतो तो मृदगंध नाकाने हृदयात भरभरून साठवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ, त्यापेक्षा उन्हही पडलेलं असते पाऊसही पडत असतो त्यावेळी खूप गंमत वाटते. आकाशातील इंद्रधनुष्य मन प्रसन्न करुन टाकते. तसेच श्रावणातले प्राणी, माणूस, देवदेवतांचे स्मरण करुन देणारे सांवरही मनाला खूप आनंद देतात. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी इत्यादी सणाचे महत्व जाणून सगळ्यांनी मिळून साजरे केलेले आनंददायी उत्सव तसेच दिवाळीसारख्या सणांत भाऊ-बहीण, बाप-मुलगी, नवरा-बायको, आई-वडील, मुलेबाळे ह्यांच्यासोबत फराळ, फटाके, हास्य-विनोद आणि प्रेमाची देवघेव करत एकमेकांसोबत लुटलेला निर्भेळ आनंद प्रत्येकाने अनुभवला आहेच. प्रत्येक सण एक वेगळा साज आणि अंगाला आनंद घेऊन येतो.तसं पाहिलं तर हे दरवर्षी नियमितपणे येणारे सण पण ते आपल्याला तितकाच किंबहुना थोडा जास्तच आनंद देतात.
एखाद्या वर्षी हे सण आपण उत्साहाने तसेच आनंदाने साजरे करु शकत नाही. केवळ उपचार म्हणून साजरे करतांना मनात वेदना असते. देवाघरी गेलेल्या माणसाची उणीव आपल्याला सतत भासत असते. कौटुंबिक कलहामुळे सुद्धा आनंद संपूर्णतया उपभोगला जात नाही तर काही वेळेस कुठल्या तरी अपयशाची खंत मनात सलत असते. काळ हे सर्वांवर उत्तम औषध आहे. कालाय तस्मै नमः |
शेवटी आयुष्य आहे. त्यात अशा आनंदाच्या गोष्टी घडतील तसेच क्लेशकारक प्रसंगही येतील. माणूस ते दुःखाचे, अपयशाचे, अपमानाचे प्रसंग मनात ठेवून कुढत राहतो, मनातल्या मानत घुसमटतो. सहसा कुणाजवळ बोलत नाही. अगदी जवळच्या माणसाने काळजीने, प्रेमाने विचारले तर अत्यंत निराशेने सांगतो, पण सांगतानाही हातचं राखतोच तेव्हा आपण त्याला धीर दिला पाहिजे. एवढा काही कठीण प्रसंग नाही अशा गोष्टी तर प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतात. तू हैतुन नक्कीच बाहेर पडशील असा विश्वास द्यावा. शक्य असलेली मदत मी करीन अशी ग्वाही द्यावी. आपल्या आधाराचा हात त्याच्या पाठीवर ठेवावा. शब्दांपेक्षाही स्पर्श काही वेळेला फार चांगले काम करुन जातो.
आपल्या बोलण्यातून कदाचित तो सावरेलसुद्धा. त्याला आपलं बोलणं पटेलही. समाधानाने आपल्या काळजीतून तो थोडाफार बाहेर पडेल. पुन्हा आपल्या कमला लागेल. माणसात मिसळू लागेल, बोलू लागेल, थोडंफार हसूही लागेल. तो सावरतो आहे हे पाहून आपल्याला जो काही आनंद होईल तो वेगळाच. म्हणजे आपल्याला शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असा असेल. आपण दुसऱ्याला दिलेला आनंद मोठा कि दुसऱ्याने आपल्याला दिलेला आनंद मोठा ह्याची आपण तुलनाच नको करु या. मात्र आपण दिलेल्या आनंदाला एक सोनेरी किनार असते. कारण ज्ञान जसे दिल्याने वाढते तसाच आनंदही दिल्याने वाढतो.
आनंदाचे सुद्धा छोटे. मोठे खूप प्रकार असतात. ते आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येवोत. आपण ठरवलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला खूप आनंद घेता येईल. मात्र तो आनंद घेण्याची इच्छा असली पाहिजे.
आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत आनंद पहा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा. आपल्याही आनंदात त्यांना सामील करुन घ्या. पण जास्त करुन दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बना. आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होतो हि कल्पनाच फार सुखद आहे. तसंच दुसऱ्याच्या दुःखातसहभागी व्हा. त्यांचं दुःख कमी होण्यासाठी, सुसह्य होण्यासाठी त्यांचं सांत्वन करा. मात्र काही झालं तरीही दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होऊ नका.
बघा, दुसऱ्याला आनंद द्या आणि जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद स्वतः मिळवा. आनंद द्यावा, आनंद घ्यावा, आनंद जीवनाचा विसावा.
श्री संत तुकाराम महाराजांच्या "आनंदाचे डोही आनंद तरंग.." ह्या अभंगाने केलेल्या लेखाच्या सुरवातीचा शेवट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे ह्यांच्या 'आनंदी आनंद गडे...' ह्या कवितेच्या पहिल्या दोन कडव्यांनी करावा असे मला मनापासून वाटते.
निसर्गावर मनापासून प्रेम करणारे 'बालकवी' म्हणतात, बघा आनंद कसा सगळीकडे भरला आहे.
श्रीमती सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत - ऑगस्ट २०१५
Thursday, 28 May 2020
मनात आलं लिहिलं : आनंद
आनंदाचे डोही | आनंद तरंगआनंदाची अंग | आनंदाचे || धृ ||
काय सांगो झाले | काहीचिया बाही
पुढे चाली नाही आवडीने || १ ||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथील जिव्हाळा तेथे बिंबे || २ ||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखी आला || ३ ||
७५१७२८१६३९
Monday, 18 May 2020
कविता-काव्य आणि गाणे


सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत जुलै - २०१६
वेळा
गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...
-
तुम्ही देव पहिला आहे का ? नाही न ! मीही नाही पहिला. तरीही आपण तर्क - वितर्क करतच बसतो. देव म्हणजे काय ? देव आहे कि नाही ? असला तर कुठे आह...
-
कविता हे एक साहित्याचे महत्वाचे अंग आहे. अंतःकरण, अनुभव यातून कवितेचा जन्म होतो. भावुक मन हा कवितेचा गाभा आहे. असं असलं तरी कविता एक उर्...
-
गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...
