Monday 18 May 2020

कविता-काव्य आणि गाणे



कविता हे एक साहित्याचे महत्वाचे अंग आहे. अंतःकरण, अनुभव यातून कवितेचा जन्म होतो. भावुक मन हा कवितेचा गाभा आहे. असं असलं तरी कविता एक उर्मी आहे. कविता हा मनाचा हुंकार आहे. एखादी कविता सहा महिन्यातही पूर्ण होत नाही. काही वेळेस एका दिवसात तीन कविता लिहिल्या जातात. कारण कविता करता येत नाही, ती स्फुरावी लागते. कविता म्हणजे प्रेम, कविता म्हणजे माया, ममता, वात्सल्य, कविता म्हणजे शृंगार, कविता म्हणजे सहृदयता, कविता म्हणजे देशभक्ती, वीरश्री आणि कविता म्हणजे आभाळ फाटलेला आक्रोश - सुद्धा.


आयुष्यात खाललेले टक्के - टोणपे, जीवनात वाट्याला आलेली सुखं दुःखे, काही करुण अनुभव तसेच प्रेमाचे, मायेचे, वात्सल्याचे, माणुसकीचे, मनाला प्रसन्न करणारे आनंददायी क्षण या सर्वांना आलेले मूर्त शब्दरुप म्हणजे कविता. कवितेतून कवीच्या मनाच्या उत्कट भावना प्रकट होतात. कविता वाचून माणूस अंतर्मुख झाला पाहिजे. कवितेचा स्पर्श मोरपिसासारखा मऊ व संवेदनशील असला पाहिजे. 

कविता म्हणावी, कविता गुणगुणावी, कविता गावी सुद्धा, इतकंच काय कविता नुसती शब्दांच्या अर्थांचे वेध घेत समजून उमजून मनापासून वाचली तरीही ती मनाला खूप आनंद देते. कविता म्हणजे स्वच्छ, सुंदर, निर्मळ आनंद मग ते बडबडगीत असो, बालगीत असो, प्रणय गीत असो, देशभक्तीपर गीत, वीरश्री - गीत, अगदी मनात कालवाकालव होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू काढणारे शोक गीत का असेना ते आपल्या मनाचा पूर्ण ठाव घेऊन कवींना आपल्याला नेमकं त्या जागी नेऊन सोडते. फक्त ती कविता अर्थपूर्ण असली पाहिजे आणि तिच्या शब्दात मनात घट्ट रुतून बसण्याची ताकद असायला हवी.

कविता सर्वांनाच आवडतात असे नाही पण समाजाला कवितेची आवड असायला हवी. कविता माणसाला मंत्रमुग्ध करते. आपल्याला गाणे आवडते ना ? मला नाही वाटत असा एखादा माणूस असेल ज्याला गाणे आवडत नाही. आणि गाणे म्हणजे तरी काय ? गेय कविता म्हणजेच गाणे. 

आपल्या महाराष्ट्रात कितीतरी मोठं-मोठे तोडीस तोड कवी होऊन गेले. त्यांचे काव्य आजही आपल्याला स्तिमित करते, खूप आनंद देते आणि जगण्याची दिशा दाखवून जगण्याचे बळ देते. तसेच गाण्याला आपले सर्वस्व वाहून टाकणारे खूप सारे पट्टीचे गायक याच महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांच्या गाण्याने आपल्याला खूप आनंद दिला. दुःख विसरायला लावले. आयुष्य जगायला भाग पाडले. हि फार लांबची खूप आधीची नाही तर गेल्या एक दोन शतकातली गोष्ट आहे. त्याही पूर्वी संत तुकाराम कवी ज्ञानेश्वरांसारखे खूप सारे कवी आणि गायक होऊन गेले, आजही आहेत आणि पुढेही होतील. 

गाण्यात एव्हढी ताकद आहेच. पण हे गाणं म्हणजे तरी काय असतं ? सजलेली एक सुंदर कविता - म्हणजे गाणं 

एक प्रतिभावान कवी एखाद्या चांगल्या अशा छोट्या मोठ्या विषयांवर शब्दांचे रंगी बेरंगी हार गुंफून पाडव्याचे इमले चढवून त्याला आगळावेगळा अर्थ देऊन एक छान कविता करतो. कुशल चाल - देयक त्याला योग्य चाल देतो. गुणी संगीतकार आवश्यकतेनुसार वाड्याचा उपयोग करुन योग्य तो समन्वय साधून कवितेला संगीत देतो आणि एक हुशार आणि पट्टीचा गायक शब्दाचा नेमका अर्थ समजून तो संपूर्ण भाव आपल्या गाण्यात जसाच्या तसा उतरवतो आणि त्या कवितेचं अगदी बावनकशी सोन करुन टाकतो. 

आमच्या आधीची किंवा त्याच्याही आधीची पिढी असेल बायका जात्यावर पायली, पायली दळण ओव्या म्हणत दळत असत. तेव्हा म्हणजे ओव्या म्हटल्यामुळे त्यांना दालनाचे श्रम वाटत नव्हते. आपण कल्पनेत सुद्धा एव्हढे दळण काव्याचा कुठलाही प्रकार म्हणून दळू शकणार नाही. काळाची गरज आणि पिढ्यांचा फरक असला तरी गाण्याने श्रम कमी होतात एव्हढे मात्र खरे. माझी आजी म्हणायची "जात्यावर बसल्यावर ओव्या सुचतेच", अशी एक म्हणच आहे. 

आपला भारत देश संस्कृती प्रधान आहे. संगीताचा भोक्ता आहे. म्हणून आपल्या बऱ्याच संस्कारात गाण्याला महत्व आहे. आपण लग्न, मौंज, नामकरण, मंगळागौर, हरतालिका वगैरे सारख्या कार्यक्रमात गण्याला जास्त प्राधान्य देतो. लग्नात मंगलाष्टके, मुहूर्ताची गाणी, विहिणी, मुलीला निरोप, सुनेचे स्वागत, मौंजीत मातृभोजन गीत, बटूला उपदेश, आणि मंगळागौर, हरतालिका, कोजागिरी वा कुठलंही जागरण. जागरण तर काय गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तेव्हा तर कुठलेही गाणे चालते. नाटक, सिनेमा, भावगीते, भक्तिगीते, भजन, कविता, श्लोक, आरत्या, स्तोत्र काहीही. हे केव्हा तर जेव्हा जगारांवेळी आपण अंताक्षरी खेळतो तेव्हा. कारण आपल्याला गाण्याची मजा लुटायची असते. गाण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असतो. मग कशाला हवे अन्ताक्षरीचे नियम आणि कायदे ? फक्त गाणे, आणि गाणे. फक्त गंमत, नुसती मजा एकदम धमाल. केव्हा उजाडते तेही नाही कळत. 

अंगाई गीत तान्ह्या बाळाला झोपवताना आई गाणं म्हणते. त्याला सूर, लय, ताल, चाल असेल असे नाही पण ती मायेने, ममतेने, वात्सल्याने बाळाला झोप यावी म्हणून ज्या आर्त स्वरात गाणे म्हणते ते स्वर बाळाला बरोबर झोप आणतात. शब्द तरी कसे ? गाई, गाई बाळ माझं झोपी जाई, काऊ आला, चिऊ आली बाळाला खाऊ देई. भू, भू हात रे, गाई, गाई अन असंच काही बाही. ते तर बाळाला झोप अनंताचा पण घरातल्या इतरांनाही ऐकायला आवडतं. 

समजा आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात गेलो, वाद्यवृंद चांगला आहे, वादकही गुणी आहेत, गायक प्रसिद्ध आहेच तसंच पट्टीचा आणि समजून उमजून गाणारा आहे. सर्व प्रकारच्या श्रोत्यांसाठी गाणारा आहे. 

अफलातून कवीच्या कविताच त्याने निवडल्या आहेत. तो बालगीत गातो, आपल्याला आपले बालपण आठवते. तो प्रणयगीत गातो, तरुण एकदम फुलारून उठतात आणि ज्येष्ठांनाही आपले तारुण्यातले दिवस आठवतात. तो भावगीत गातो आपण भावविभोर होऊन गाण्यातच गुंततो. तो भक्तीगीत गायला सुरुवात करतो, एखादं भजन म्हणतो तेव्हा आपण भक्ती रसात बुडून जातो. क्षणभर आपण देवळात आले आहोत असेच वाटते. मुलगी सासरी पाठवणी करणारे गीत जर त्याने गायले तर आमच्यासारख्या बाया-बापड्यांचे डोळे आपसूकच भरुन येतात. हि सगळी ताकद गायकाने गायलेल्या गायकीची तर आहेच. वादकांचीही आहेच. पण तेव्हढीच किंवा थोडी जास्त कमाल असते सगळा साज शृंगार करुन सर्वांगाने नटलेल्या कवीला स्फुरलेल्या कवितेची. खरं म्हणजे कवी - कल्पनेची म्हणजे कवीचीच. 


तर अशी असते कवीची किमया आणि त्याची कविता ! मनाचा ठाव घेणारी, खूप आनंद देणारी, एखाद्याला अक्षरशः वेड लावणारी, तिच्या शब्दातच, शब्दात सांगता येणार नाही अशी विलक्षण जादू असते.  महाराष्ट्रातल्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही सर्व प्रतिभावान कवींना आणि त्यांच्या कवितेला श्रीमंत आणि समृद्ध तसंच अजरामर करणाऱ्या गायक आणि वादकांनाही माझं मनापासून त्रिवार वंदन ! 


तसंही कवी आणि गायक  या दोघांचं खूप जवळच नातं आहे. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करुन स्वतः गायलेलं गीत रामायण होय. याचा वर्षी श्रीराम नवमीला गीत रामायणाला ६१ वर्षे पूर्ण झाली. ६१ वर्षांनंतरही गीत रामायणातली कथा, कविता, काव्य आणि गायक तेव्हढंच नवीन व ताजं टवटवीत आहे. "काव्य नव्हे हा अमृतसंचय" असे म्हणून सर्व मराठी व अमराठी माणसांनी त्याला मान्यता दिली आणि आपल्या हृदयात पूजेचं स्थान दिलं. आता गदिमाही नाहीत आणि बाबुजीही नाहीत पण त्यांचं गीत रामायण प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. दोघांनाही मनापासून आदरांजली. 


सुनंदा विष्णू कुळकर्णी 
७५१७२८१६३९
अभिनीत जुलै - २०१६ 

6 comments:

  1. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete
  2. छान मस्त लेख ...

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete
  3. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...