Thursday 14 May 2020

मनात आलं लिहिलं : देव


तुम्ही देव पहिला आहे का ? नाही न ! मीही नाही पहिला. तरीही आपण तर्क - वितर्क करतच बसतो. देव म्हणजे काय ? देव आहे कि नाही ? असला तर कुठे आहे ? त्याला कोणी पाहिलं आहे का ? नसेल पाहिलं तर त्याला मानायचं कि नाही ? मी आस्तिक आहे म्हणजे माझी देवावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. मी नास्तिक आहे म्हणजे मी देवच मानत नाही. मग मी त्याच्यावर विश्वास का ठेवावा ? हे सारे प्रश्न निरर्थक आहे असं मला वाटतं. हे प्रश्न आपल्याला पडतातच कां ? हाच मला खरा प्रश्न आहे. देव असेल नसेल माहित नाही. पण या साऱ्या विश्वाचा, आकाश पृथ्वीचा, तसेच निसर्गाचा समतोल सांभाळणारा कुणीतरी असेलच ना ? नक्कीच आहे. तो कोण असावा ?

हवा आपल्याला दिसते कां ? नाही दिसत. पण उन्हाळ्यात झाडाखाली बसल्यावर आलेली थंड हवेची झुळूक, पसल्यातील शितोळा वाहणारी दमट हवा तसेच हिवाळ्यातील अंगावर शहारे आणणारी थंडगार हवा आपल्याला चांगली जाणवते आणि सुखावते सुद्धा. तसंच काहीसं देवाचं असावं.

आपल्यावर एखादं थोडंसं जरी संकट आलं कि, आपण म्हणतो, "देवा काय केलंस हे ? कां केलंस ?" आणि आपण त्यातून सही-सलामत बाहेर पडलो किंवा दुसरं काही चांगलं घडलं तर लगेच म्हणतो, "Thanks God". तर हे असं कां होतं ? त्यामागे नक्कीच हृदयाच्या एका कप्प्यात आपली देवाविषयीची श्रद्धा आहे. वाईट प्रसंगात अनवधानाने कां होईना सगळेच म्हणतात, "देवा, धाव बाप्पा, आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. ह्यातून तूच आम्हाला वाचवू शकशील !" हे कशाचं प्रतिक आहे ? देव असल्याचं आपण मान्य केलं किंवा मान्य केलं नाही तरी देवाचं अस्तित्व आपल्या मनात कुठेतरी घर करुन आहे आणि हेच आपल्याला कळत नाही. पण ते सत्य आहे.

जगात पशु-पक्षी, जीव-जंतू, जलचर, विचार, उभयचर, निशाचर असे खूप सारे सजीव प्राणी आहेत. ह्या सर्वात मानवप्राणी असा आहे कि, त्याच्याजवळ बुद्धी आहे. आपल्या बुद्धीचा उपयोग करुन त्याने आपल्या जीवनात खूप सुखसोयी निर्माण केल्या आहेत. कशामुळे ? तर निसर्गाची त्याच्यावर कृपादृष्टी आहे. मानवप्राणी हि निसर्गाची सर्वात उत्तम निर्मिती आहे. मनुष्य बुद्धिमान आहे. त्याच्याजवळ आकलन शक्ती आहे. तो चांगला व वाईट असा सारासार विचार करु शकतो. त्या विचारानुसार तो घडतो.


एका मोटारकार आहे. माणसांनीच बनविलेली आहे. सुसज्ज आहे. वातानुकूलित आहे आणि चांगला वेग देणारी आहे. रंगही मस्त आहे. नुसतं बघत राहावंसं वाटतं पण ती चालवायला चालकच नाही. म्हणून ती एका ठिकाणी उभी आहे. कारण चालकाशिवाय ती चालूच शकत नाही. तसंच अगदी तसंच ह्या एवढ्या मोठ्या जगाचा डोलारा सावरणारा आणि साऱ्या विश्वाचा कारभार सांभाळणारासुद्धा कुणीतरी नक्कीच आहे. मग त्याला तुम्ही देव म्हणा, नियती म्हणा किंवा निसर्ग, विश्वचक्र किंवा एखादी शक्ती म्हणा. काहीही म्हणा, पण हे जग चालविणारा कुणीतरी आहेच. त्यामुळे जगाचं रहाटगाडगं संतुलित आहे. व्यवस्थित चालू आहे. सूर्य-चंद्राचा उदय होणं तसंच त्याचं अस्ताला जाणं, एवढंस बीज रुजवलं कि, त्याला अंकुर फुटून त्याचा मोठा वृक्ष होणं, धान्य, भाजीपाला पिकवणं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंचा काळ ठरलेला असणं, जन्म-मरणाची वेळ, काळ, स्थळ ठरलेली असून कोणालाच माहिती नसणं, मी ह्याच आईवडिलांच्या पोटी जन्म घेणार आहे असं काहीही आपण ठरवूच शकत नाही. माझं मरण ह्याचवेळी, ह्याच ठिकाणी, अशा प्रकारेच होणार आहे, ह्याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. ते कुणीतरी दुसऱ्याच शक्तीने आधीच ठरविलेलं असतं आणि तसंच घडतं. आता लोकं म्हणतात, "जन्म हातात आला आहे." पण माझ्या माहितीतील गोष्ट आहे, डॉक्टर म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सीझर करु. कारण ते करावंच लागणार आहे. आम्ही २ मे हा चांगला दिवस म्हणून ठरवून टाकला. तसे डॉक्टरांना सांगितले. ते "ठीक आहे" म्हणाले. पण पेशंटला ३० एप्रिल रोजीच त्रास व्हायला लागला आणि अत्यंत आवश्यक म्हणून ३० एप्रिललाच बाळाला जन्म द्यावा लागला. तसेच काही अशा कारणांमुळे ठरलेल्या दिवशी सीझर ना होता २ / ४  दिवस बाळाचा जन्म पुढे ढकलला गेला आहे. म्हणजेच जन्म हातात आला आहे कां माणसाच्या ? मरण तर कोणाच्याच हातात नाही. एखाद्या मोठ्या आजारातून जर कोणी वाचलाच तर डॉक्टरांचे प्रयत्न तर आहेतच पण त्याच्या आयुष्याची दोरी बळकट होती असेच लोकं म्हणतात. म्हणजेच जन्म-मृत्यूची दोरे देवाने आपल्याच हातात ठेवली आहे.

जन्म-मरणाच्यामधलं आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य मात्र संपूर्णपणे आपल्या स्वतःचंच असतं ते फार सुंदर आहे. ते आपण पूर्वपुण्याईने चांगलं घालवू शकतो. पण पूर्व-पुण्याई आहे कि नाही हे हि आपल्याला माहित नाही, तरीही आपण आपलं आयुष्य प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काहीतरी सत्कार्य करुन सदाचाराने वागून दुसऱ्याला आनंद देऊन, जगण्याचं सार्थक करुन सुंदर करु शकतो. एवढं आपण नक्कीच करु शकतो. संत कबीरांचा एका दोहा आहे -

कबीरा, जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये | 
ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोये ||

जेव्हा आपण जगात येतो म्हणजे आपला जन्म होतो तेव्हा जन्म झाल्याबरोबर आपण रडतो आणि बाहेर उत्सुकतेने आपली वाट पाहणारे सगळे जण हसत असतात. पण आपण जीवनात असं कार्य केलं पाहिजे कि, हे जग सोडतांना आपण हसत हसत जगाचा निरोप घेतला पाहिजे. आणि सारे जग रडले पाहिजे. देवानं म्हणावं - तथास्तु !

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 

6 comments:

  1. खुप छान लेख..
    आईला नमस्कार सांगा गिरीशराव 🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया आईला सांगतो.

      Delete
  2. श्रीमद्भगवदगीतेतील श्रद्धावान लभते ज्ञानम्| या श्लोकाची प्रचिती या लेखातून येते.लेख आणि लेखिका दोघांनाही दंडवत प्रणाम.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया आईला सांगतो.

      Delete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...