Saturday, 16 May 2020

भारतीय संस्कृती आणि संस्कार




संस्कृती म्हणजे सर्वांगाने सारासार विचार करुन निर्माण झालेली श्रेष्ठ जीवन पद्धती ! यातला महत्वाचा विचार म्हणजे सर्वांचे कल्याण, सर्वांचे सुख व आपल्याही जीवनाचे सार्थक व्हावे. माणसाच्या "सांस्कृतिक जीवन" हा त्याचा मौल्यवान ठेवा आहे. तो आधीच्या पिढीने पुढच्या पिढीमध्ये स्वतःच्या आचरणातून अगदी सहजपणे अलगद सोपवावा. पुढच्या पिढीने त्यात मोलाची भर घालून तो पुढे पुढे न्यावा आणि हे असे पिढ्यानपिढ्या चालावे. 

अजूनही सर्व देशांत भारताचा आदर केला जातो. म्हणूनच स्वामी विवेकानंदानी शिकागोच्या 'सर्व धर्म  परिषदेत', "माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो..." अशी जेव्हा आपल्या भाषणाला सुरवात केली तेव्हा पुढचे काहीही न ऐकता अमेरिकेत उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. विवेकानंदानी अर्धी सभा तेव्हाच जिंकली. हे कशामुळे ? भारतातील 'सर्व धर्म समभाव' ह्या संस्कृतीमुळे. माणुसकी हा माणसाचा पहिला धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. साने गुरुजी म्हणतात - खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे. 


फार पूर्वी म्हणजे मी खूप लहान असतांना लोकसत्तेत चं. प. भिशीकर यांचे एक सदर (नाव आठवत नाही) यायचे. त्यातील हि खरी गोष्ट आहे. लोक एस. टी. बसचा प्रवास करीत होते. गप्पा चालल्या होत्या. भारत देश असाच आहे, अप्रगत आहे, अशिक्षित आहे, रस्ते चांगले नाही वगैरे वगैरे... असं एक इंग्रजी माणूस म्हणत होता. सगळे हो शी हो लावत होते. एका गावाला बस थांबली. त्यावर्षी पाण्याचा दुष्काळ होता. पाणीवाल्या १०/१२ वर्षाच्या मुलाकडून त्या इंग्रजाने पाणी घेतले, चार आणे झाले साहेब. त्याने त्याला आठ आणे दिले. म्हणाला ठेव तुझ्याकडे, त्याच हातावर त्यामुलाने चार आणे ठेवले आणि म्हणाला, "साहेब, पाणी खूप दुरुन डोक्यावर कळशी ठेवून आणावे लागते. खूप मान दुखते.  त्याचे म्हणजे कष्टाचे पैसे घेतो मी. पाण्याचे नाही." बस सुटली तो इंग्रज हातातल्या चार आण्यांकडे पाहताच राहिला. सगळे अवाक झाले. एक भारतीय म्हणाला, " साहेब, असा आहे माझा देश". तर हि आहे भारताची संस्कृती. देण्याची, प्रामाणिकपणाची, कष्टाची.




स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दादोजी कोंडदेव यांनी दिलेल्या शिक्षणामुळे, जिजाऊंच्या संस्कारामुळे आणि सामान्य पण एकनिष्ठ देशप्रेमाने प्रेरित झालेले मावळे याच्या आधारावर त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला. त्याकाळी मुस्लिम लोकांनी हिंदूंच्या घरादारावर नांगर फिरविला. कितीतरी हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले. सगळं भ्रष्टाचार माजवला. अशात कल्याणच्या सुभेदाराची सून पकडली गेली. वचपा, सुड म्हणून अतिशय स्वरुपवान असलेल्या सुभेदाराच्या सुनेला छ. शिवाजी महाराजांसमोर आणले गेले. महाराज रागावले, म्हणाले हे बरोबर नाही, त्यांनी तिला साडी चोळी देऊन व ओटी भरून सन्मानाने तिच्या घरी परत पाठविले. तिच्याकडे प्रेमाने, मायेने, आपुलकीने पाहत ते म्हणाले - जे दशरथ पुजारी यांनी गायलेल्या एका सुंदर गाण्यात आहे. 


अशीच आमुची आई असती सुंदर रुपवती |
आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ||

तर अशी आहे आपली भारतीय संस्कृती. परस्रीला माय-बहीण मानणारी, तिचा सन्मान करणारी.  आचार्य स. ज. भागवत म्हणतात - 
वात्सल्याने भरलेली, जीवावर प्रेम करणारी, जे जे उत्पन्न होईल ते ते वाढावे अशी जिची कल्पना आहे टी माता जीवनाची मूर्ती आहे. संस्कृती निर्माण करायची असेल तर ती मातारुपी स्त्रीच करु शकेल. आणि अशा लाखो करोडो माता माझ्या भारत देशात आहेत म्हणूनच भारतीय संस्कृतीला तोड नाही. 

आता थोडे संस्काराविषयी...



सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेलच असे नाही. पण संकारक्षम माणूस सुसंस्कृत असतोच. मग तो गरीब वा श्रीमंत असो, मोठा वा लहान असेल, शहरी वा ग्रामीण भागातील असेल किंवा शिकलेला वा अशिक्षित  असेल. संस्कार माणसावर ज्याचे त्याचे वेगळे असले तरी प्रामुख्याने संस्कार घरातूनच होतात. शाळा हे संस्काराचे दुसरे प्रांगण आहे. शाळेतल्या शिक्षकांची छाप विद्यार्थ्यांवर फार लवकर पडते. आणि म्हणूनच अभ्यासाबरोबर संस्कार करण्याची शिक्षकाची जबाबदारी हि वाढते. तसेच आई-बाबा, आजी-आजोबा, आत्या-मामा, काका-काकू यांच्या स्वभावाचा आणि वागण्याचा मुलांवर फार मोठा परिणाम होतो. आई-वडील त्यांचे दैवत असतात. मुले जशीजशी मोठी होतात, तसं त्यांच्या समोर बऱ्याच गोष्टी येतात. पण त्यातले काय चांगले ? काय वाईट ? हे त्यांना कळत नाही. पण ते समजावण्याची बुद्धी त्यांना घरातील माणसांकडूनच मुख्यतः आई-वडिलांकडून मिळते. हे असं कर, ते तसं कर हे असं त्याला फार्स सांगावं लागत नाही. आई-वडिलांच्या आणि घरातल्या सर्वच माणसांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यावर संस्कार होत असतात. 'एकत्र कुटुंब पद्धती' हा मुले उत्तम घडविण्याचा योग्य मार्ग आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यात कुरबुर असेलही, मतभेदही होतील, पण स्वतःच्या सहवासाने ते एकमेकांना इतके जोडले जातात कि त्यांच्यामधील प्रेम मात्र एकदम निखळ असते, स्वच्छ असते. आता पुढच्या पिढीत 'हम दो हमारे दो किंवा एकच' अशा जमान्यात घरात आजी-आजोबांशिवाय दुसरी माणसं कुठून आणणार ? असो. 


संस्कार मुलांवर कोवळ्या वयापासूनच व्हायला हवेत. घरात लहान मुले असली कि मोठ्या माणसांची जबाबदारी जास्त वाढते. मुले अनुकरणप्रिय असतात. जशी मोठी माणसे वागतात, तशीच ती वागतात. म्हणजे त्यांना वाटते कि असेच वागायचे असते. म्हणून घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींशी नम्रता राखली पाहिजे. लहानशी प्रेमाने वागले पाहिजे. सर्वांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. काही मतभेद झालेच तर त्याची झळ मुलांना लागत कामा नये. 

पालकांनो, मुलांना मोठं करा. त्यांना शिकवा, त्यांना जे व्हायचे असेल ते होऊ द्या. डॉक्टर , इंजिनियर होण्याचं दडपण त्यांच्यावर आणू नका. मात्र त्यांच्यावर चांगले संस्कार करा. शक्ये तो ते आपल्या वागण्यातून करा. आपल्या वागण्या-बोलण्यातूनच झालेले संस्कार मुलांच्या मनात घर करुन राहतात आणि संस्कार कधीही बेईमान होत नाहीत, चुकूनही दगाफटका करीत नाही. ते ज्यांना मिळतात त्यांच्यात रुजतात, वाढतात, फोफावतात. ते त्या माणसाला तर मोठं करतातच पण आपल्या समोरच्या माणसालाही मोठं करतात. 

तसही संस्कार आणि संस्कृती यांचं फार जवळच नातं आहे. देशाची संस्कृती त्या देशाच्या संस्कारावरच अवलंबून असते. सुसंस्कारानी संस्कृतीची वीण घट्ट होते. आपण आपलंच मिळवून खाणं हि प्रकृती आहे. म्हणजे हा मनुष्य स्वभाव आहे. दुसऱ्याचे हिसकावून घेणं, ते खाणं हि विकृती आहे. म्हणजे हि खूपच वाईट गोष्ट आहे. पण आपल्या जवळ असलेलं दुसऱ्याला देऊन उरलेलं आपण खाणं हि संस्कृती आहे. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे. तोही एक चांगला संस्कार आहे. 

परमेश्वरावर विश्वास, रागावर ताबा, क्षमाशील वृत्ती, देण्याचा स्वभाव, दुसऱ्याला समजून घेण्याची बुद्धी, तडजोड करण्याची तयारी, कर्तव्याची जाणीव, ते मनापासून पार पाडण्याची तळमळ, फल-निरपेक्ष-कर्म, दिव्यांग लोकांविषयी सहानुभूती, प्राणिमात्रांवर दया, माणसांमध्ये देव पाहण्याची वृत्ती, कुणाचे मन न दुखावणे, घरी आलेल्या माणसाचे स्वागत करणे, घरात असेल ते प्रेमाने खाऊ घालणे, आहे त्यात समाधान मानणे, मदतीची गरज असलेल्यांना मदत करणे हि माझ्या भारतीय संस्कृतीची प्रमुख सूत्रे आहेत. 

मला वाटतंय हेच खर अध्यात्म असावं ! 

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 
(अभिनीत, सप्टेंबर २०१६)

2 comments:

  1. आदरणिय सर संस्काराची शब्दविणखुप सुंदर गुंफाली आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देवदीप ! आपल्या प्रतिसादाची नेहमीच उत्सुकता राहील.

      Delete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...