Monday 8 June 2020

पैसा


असं म्हणतात, सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग कुणालाही, कधीही आणता येत नाही. पैशाशिवाय माणसाला काहीच करता येत नाही. पैशांवाचून सगळ्यांचच अडतं. पैसा माणसाला दहा माणसात बसवतो आणि दहा माणसातून उठवतो सुद्धा ! 

पैसा ! पैसा म्हणजे आहे तरी काय ? जगण्यासाठी लागणारी एका अत्यंत गरजेची गोष्ट. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख तीन गरजा आहे. पण यासाठी प्रामुख्याने पैसा लागतो. पैसा मिळविण्यासाठी कष्ट करावे लागतात. कोणाला तो पिढीजात वारसातूनही मिळतो. आपल्याला जो आणि जेवढा पैसा मिळतो तो योग्य तऱ्हेने कसा वापरावा याचं एका गणित असावं. म्हणजे असायला पाहिजे ते सगळ्यांनाच सोडवता येईल असे नाही. पण जर ते प्रत्येकाला सोडविता आलं तर सगळेच सुखी होतील. अर्थात सुख सुद्धा मानण्यावरच असतं म्हणा. 

"आपलं अंथरुण पाहून पाय पसरावे" माझा भाऊ म्हणायचा " अंथरुण सुरवातीलाच मोठं आणलं तर ?" माझी आई म्हणायची " अवश्य, स्वतःच्या सामर्थ्यावर प्रामाणिकपणे आणावं. त्यावर दुसऱ्याला सुद्धा जागा देणं शक्य असेल तर द्यावी." तसं तर नेहमीच माझी आई म्हणायची "सायकलवर असणाऱ्याने मोटारीत बसणाऱ्याकडे पाहून नये, पायी चालणाऱ्या माणसाकडे पहावे आणि आहे त्यात समाधान मानावं." पण माणूस अल्पसंतुष्ट कधीच नसतो. त्याला खूप काही हवं असतं. पण भरपूर पैसा मिळण्यात  थोडा फार नशिबाचाही भाग असतो.

तसं म्हटलं तर पैसाच काही सर्वस्व नसतो. पण त्याच्यावाचून अडतं ही मात्र सुर्प्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट गोष्ट आहे. पैसा मिळवावा, खूप पैसा मिळवावा. मात्र तो मिळविण्याचा मार्ग फक्त सत्य आणि प्रामाणिकपणाचा असावा. 

कुठे ते आठवत नाही पण मी वाचले आहे. संगणकावर सतत एकसारखं खूप काम करण्याऱ्या बाबांना त्यांची पाच वर्षाची मुलगी म्हणते " बाबा, तुम्हाला संगणकावर एक तास काम करायचे किती पैसे मिळतात ? तेव्हढे या माझ्या मनी बँकमधून घ्या. मला तुमचा एक तास हवा आहे. मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या बरोबर खेळायचे आहे. " यावरून मला असे सुचले उद्या बायकोही म्हणेल "अहो, नका जाऊ या रविवारी ओव्हरटाईम करायला आपण मुलांना घेऊन कुठे तरी बाहेर फिरायला जाऊ या."  आणि आई-बाबा तर खात्रीने म्हणतीलच, " बाळा, किती तरी काम करतोस ? नको इतके कष्ट करु, जरा खातपित जा, झोप घे, आराम कर, थोडा मोकळ्या हवेत फिरुन ये, मोकळा श्वास घे. राजा, नको हवे आहेत इतके जास्त पैसे, खरच आम्हाला फक्त तूच हवा आहे." 

तर असा हा पैसा ! नात्यापासून दूर नेणारा, भावनांशी खेळणारा, माणसाला एकटं पाडणारा, अजून हवा असं वाटणारा, हाव निर्माण करणारा, नको इतकं थकविणारा पैसा... 

पण तेवढाच आवश्यक असलेला, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गरज असणारा, नाती जवळ आणणारा, भावना जपणारा, घरातल्या लहान - मोठ्या माणसांशी  सुसंवाद साधण्यासाठी खूप सारी मदत करणारा, माणसं जोडणारा. तोही पैसाच ! 

विद्यार्थी मित्रांनी, चांगली नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आईबाबांना वाटत असेल आपला मुलगा चांगला डॉक्टर, उत्तम इंजिनियर, मोठ्ठा ऑफिसर किंवा कुशल व्यावसायिक व्हावा आणि खूप पैसे मिळवून तो सुखात राहावा. त्याच्या अपेक्षा बरोबरही आहेत. शिक्षण घेतांना आपल्याला कशात रस आहे, आपण कशात प्रगती करु शकतो, आपण कोणतं काम चोख करु शकतो याचाही विचार करा. तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल याचा अंदाज घ्या. तुमचा कला कुठे आहे ? हे अजमावण्यासाठी आशा फौंडेशनसारख्या संस्था कार्यरत आहेत. I AM Test सारख्या परीक्षा द्या. (Intelligence And Aptitude Measurement )

संस्थेतल्या समुपदेशकाकडून समुपदेशन करुन घ्या. एखाद्या व्यवसायाकडे वळा. तो प्रामाणिकपणे करा. अगदी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे असेल नेमका तिकडेच कल असेल तर त्या क्षेत्रातही जा. शिक्षक, प्राध्यापक व्हा. भरपूर पैसे मिळवा. पण मिळविलेल्या पैशाचा योग्य विनियोग करा. आपल्या कमाईत गोर-गरीब, अपंग, अनाथ यांचाही वाटा असतो याचं भान ठेवा. घरातील लहान थोर मंडळींच्या गरजा पूर्ण करा. माणुसकी आपला धर्म समजा. आयुष्यात सुखाने, मान-सन्मानाने जगा. लक्षात ठेवा, आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला सर्वात जास्त महत्व आहे. 

पैशाने माणसे जोडली जात असली तरी त्या पैशाच्या दानतीत प्रेम असले पाहिजे. माणुसकी व जिव्हाळा हवा. पैसे फेकून माणसाचे प्रेम विकत घेता येत नाही. मानलेली नातीही काही वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतात. प्रेम आतून असावे लागते नाही तर तुकाराम महाराजांच्या अभंगासारखे व्हायचे- मोले घातले रडाया | नाही असू, नाही माया.

कुठल्यातरी जमातीत म्हणे माणूस मेल्यावर रडायला भाड्याने माणसे आणतात. त्यांच्या मनात प्रेम. माया तर नसतेच पण डोळ्यात खोटे अश्रूसुद्धा नसतात. रडण्याचा आवाज मात्र मोठमोठ्याने गळे काढत हळू हळू वाढतच जातो. 

पैशाने माणूस विकत घेता येईलही, तो तुमच्याकडे तुम्ही मोजलेल्या पैशात राबेलसुद्धा. पण त्यात प्रेम, माया, आपुलकी असणार नाही. तो तुम्ही जे आणि जसं सांगाल, तसंच वागेल. तुमचा फायदा तोटा या दोन्ही गोष्टीशी त्याचं काहीही घेणं देणं नसेल. 

या उलट आपण कधीतरी केव्हातरी कोणाला तरी केलेली एवढीशी मदत तो माणूस कायम लक्षात ठेवतो आणि सहजच चारचौघात बोलून दाखवतो तेव्हा आपल्यालाच कसे तरी होते व त्या माणसाविषयी एकदम आदर वाटू लागतो. खरं म्हणजे ही गोष्ट आपल्या स्मरणातून कधीच निघून गेलेली असते. कारण मदत खूप छोटी असते. 

आमच्या आधीची पिढी म्हणायची, "संसारात थोडी काटकसर करावी. अडचणी सहन कराव्या पण दोन पैसे बाळगून असावे. अगदीच पैशाची निकड असली तर आपण ते पैसे वापरु शकतो. दुसऱ्याजवळ मागायची वेळ येत नाही." त्याचं हे सांगणं आमच्यापुरतंच मर्यादीत नव्हतं. तर प्रत्येक पिढीनेच अगदी लक्षात ठेवून आचरणात आणावं इतकं महत्वाचं आहे. 

आपल्या भारतीय संस्कृतीत पैशाला देव मानतात. पैशाचे लक्ष्मी म्हणून पूजन करतात. आजही कित्येक घरात घरातला कर्ता पुरुष आपल्या महिन्याचा पगार देवाजवळ ठेवतो. घरातील गृहिणी "पैशाला बरकत दे " अशी देवाला प्रार्थना करते आणि मगच पैसे घर खर्चासाठी वापरले जातात आणि म्हणूनच दीपावलीला मोठ्या सन्मानाने लक्ष्मीपूजन केले जाते. 

पैसा खूप मिळवावा म्हणजे रात्रीचा दिवस करुन मिळवावा, खूप कष्ट करावे. स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करावी, तहान भूक विसरुन जावी. घराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे. घरातल्या वडिलधाऱ्यांची आबाळ करावी असे मुळीच नाही. कारण पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी चंचल असते. म्हणून फक्त पैशाच्या मागे लागू नये. लक्षात ठेवावे आपण पैशासाठी नाही तर पैसा आपल्यासाठी आहे. पैशाचा इतकाही हव्यास करु नये कि, त्याचा उपयोग घेण्यासाठी आपल्याजवळ वेळ तर नसेलच पण तेवढा तकवाही नसेल. पॆसा आपले आईबाबा, बायको, भाऊ, बहीण, मुलंबाळं, नातेवाईक यांच्या आनंदासाठी योग्यवेळी खर्च करा. त्यांच्या सहवासात तुम्ही स्वतःही आनंद घ्या. आर्थिक मदत करा. थोरांबाबत सेवावृत्ती ठेवा. 

पुढे संसारातील जबाबदाऱ्या, संपल्यामुळे आपल्याजवळ भरपूर वेळ असला तरी केवळ पैशाच्या मागे लागल्यामुळे आपण संसारातले आनंदाचे क्षण तर गमावलेच आहेत. पण नको इतके कष्ट करुन आपण आपल्या प्रकृतीचीही वाट लावली आहे. मग कसा घेणार मिळविलेल्या पैशाचा उपभोग ? तर असे व्हायला नको. पैसा जरुर कमवा. मुलाबाळांना शिकवा, खूप मोठं करा, त्यांना भरभरुन प्रेम द्या. भावाबहिणीचं  प्रेम जपा. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांच्याशी सुसंवाद साधा. विचारपूस करा. त्यांच्याशी कृतज्ञ राहा. वडीलधाऱ्या मंडळींच्या भावनांचा आदर करा. बायको पोरांची योग्य ती हौस पुरवा. सगळ्यांसोबत आनंदाचे जीवन जगा. म्हातारपणी त्या आठवणी तुम्हाला तुमच्या आयुष्याची मोठीच कमाई  वाटेल. त्या आठवणींचा आनंद घेत तुम्ही तुमचं व्याधी असलेले म्हातारपण सुद्धा सुसह्य कराल आणि दुर्दैवाने आयुष्याच्या संध्येला जर तुम्ही एकटे म्हणजे जोडीदाराशिवाय असाल तर त्या आनंददायी आठवणी तुमच्यासाठी अमूल्य ठेवा असतील. क्लेशकारक आठवणीही असतील. पण सकारात्मक विचार करुन त्याही कधी मधी आठवा. गंमत तर वाटेलाच पण मजाही येईल. मग तुमच्याजवळ पैसा असला काय किंवा नसला काय. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आयुष्याची संध्याकाळ  यशस्वी कराल. सुंदर कराल. 

वारसाहक्कातून किंवा लॉटरी लागून मिळालेल्या गडगंज पैशामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल, त्याचाही वापर तुम्ही योग्य तऱ्हेने करु शकता. पण कष्टाने, प्रामाणिकपणाने, घाम गाळून, मिळविलेल्या गडगंज पैशामुळे माणूस भला माणूस होतो. खरं म्हणजे आयुष्यात खाल्लेले टक्के टोणपे तसेच आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगामुळे प्रत्येक वेळी माणूस नव्याने घडतो. 

सुनंदा वि. कुळकर्णी 
७५१७२८१६३९ 
अभिनीत जून २०१५ 

8 comments:

  1. पैसा म्हणजेपिशाच्च,तेमानगुटीवर बसायला नको,
    हा महवाचा संदेश सरळ,सोप्य प्रकारे दिला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपल्या प्रतिसादाबद्दल....

      Delete
    2. पैशांचं महत्त्व अतिशय प्रॕक्टीकल आणि कुणालाजही सहज समजेल अशा पद्धतीने मांडण्यात आलंय.

      Delete
    3. धन्यवाद.आपल्या प्रतिसादाबद्दल.
      सुनंदा वि.कुलकर्णी.

      Delete
  2. मा सुनंदा ताई, आपल्या लेखातील शब्दन शब्द विचार प्रवर्तक आहे, खूपच सुंदर विचार मांडलेत नव्हे असंख्य जीवांना मार्गदर्शन केलेत. मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपले नाव शेवटी लिहिल्यास प्रतिक्रिया कोणाची आहे ते कळेल.

      Delete
  3. खुपच छान लिहितात काकू ,,, तुझ्याकडे ही कला काकुंकडूनच आली आहे ,,
    Great

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपले नाव शेवटी लिहिल्यास प्रतिक्रिया कोणाची आहे ते कळेल.

      Delete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...