Thursday 4 June 2020

मनात आलं लिहिलं : आनंद

मागील लेखावरून पुढे...

समाज एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या ४० जागा भरायच्या आहेत. त्या जागेसाठी १००० पात्र तरुण उमेदवार मुलाखतीसाठी आले आहेत. ठरल्याप्रमाणे ४० तरुणांची नियुक्ती झाली म्हणून उरलेल्या ९६० उमेदवारांचा हक्क, आनंद ह्या ४० उमेदवारांनी हिसकावून घेतला, असे होत नाही. ती त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व होतं. तसंचते त्यांचं नशीबही होतच. नोकरी मिळाल्याचा आनंद स्वच्छ, निखळच असतो.

आपल्याला झालेला आनंद आपण केव्हाही एकदा आपल्या जवळच्या माणसाला सांगतो आणि त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतो असे आपल्याला होऊन जाते. स्वतःच्या बाबतीत घडलेली चांगली गोष्ट अन त्यामुळे आपल्याला झालेला आनंद दुसऱ्याला सांगण्यात कुणाला कमीपणा वाटत असेल असे मला तरी वाटत नाही.

पावसाळा दरवर्षी येतो पण उन्हाने अतिशय तापलेली जमीन पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने ओली होते आणि मातीला जो सुगंध येतो तो मृदगंध नाकाने हृदयात भरभरून साठवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ, त्यापेक्षा उन्हही पडलेलं असते पाऊसही पडत असतो त्यावेळी खूप गंमत वाटते. आकाशातील इंद्रधनुष्य मन प्रसन्न करुन टाकते. तसेच श्रावणातले प्राणी, माणूस, देवदेवतांचे स्मरण करुन देणारे सांवरही मनाला खूप आनंद देतात. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी इत्यादी सणाचे महत्व जाणून सगळ्यांनी मिळून साजरे केलेले आनंददायी उत्सव तसेच दिवाळीसारख्या सणांत भाऊ-बहीण, बाप-मुलगी, नवरा-बायको, आई-वडील, मुलेबाळे ह्यांच्यासोबत फराळ, फटाके, हास्य-विनोद आणि प्रेमाची देवघेव करत एकमेकांसोबत लुटलेला निर्भेळ आनंद प्रत्येकाने अनुभवला आहेच. प्रत्येक सण एक वेगळा साज आणि अंगाला आनंद घेऊन येतो.
तसं पाहिलं तर हे दरवर्षी नियमितपणे येणारे सण पण ते आपल्याला तितकाच किंबहुना थोडा जास्तच आनंद देतात.
एखाद्या वर्षी हे सण आपण उत्साहाने तसेच आनंदाने साजरे करु शकत नाही. केवळ उपचार म्हणून साजरे करतांना मनात वेदना असते. देवाघरी गेलेल्या माणसाची उणीव आपल्याला सतत भासत असते. कौटुंबिक कलहामुळे सुद्धा आनंद संपूर्णतया उपभोगला जात नाही तर काही वेळेस कुठल्या तरी अपयशाची खंत मनात सलत असते. काळ हे सर्वांवर उत्तम औषध आहे. कालाय तस्मै नमः |
शेवटी आयुष्य आहे. त्यात अशा आनंदाच्या गोष्टी घडतील तसेच क्लेशकारक प्रसंगही येतील. माणूस ते दुःखाचे, अपयशाचे, अपमानाचे प्रसंग मनात ठेवून कुढत राहतो, मनातल्या मानत घुसमटतो. सहसा कुणाजवळ बोलत नाही. अगदी जवळच्या माणसाने काळजीने, प्रेमाने विचारले तर अत्यंत निराशेने सांगतो, पण सांगतानाही हातचं राखतोच तेव्हा आपण त्याला धीर दिला पाहिजे. एवढा काही कठीण प्रसंग नाही अशा गोष्टी तर प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतात. तू हैतुन नक्कीच बाहेर पडशील असा विश्वास द्यावा. शक्य असलेली मदत मी करीन अशी ग्वाही द्यावी. आपल्या आधाराचा हात त्याच्या पाठीवर ठेवावा. शब्दांपेक्षाही स्पर्श काही वेळेला फार चांगले काम करुन जातो.

आपल्या बोलण्यातून कदाचित तो सावरेलसुद्धा. त्याला आपलं बोलणं पटेलही. समाधानाने आपल्या काळजीतून तो थोडाफार बाहेर पडेल. पुन्हा आपल्या कमला लागेल. माणसात मिसळू लागेल, बोलू लागेल, थोडंफार हसूही लागेल. तो सावरतो आहे हे पाहून आपल्याला जो काही आनंद होईल  तो वेगळाच. म्हणजे आपल्याला शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असा असेल. आपण दुसऱ्याला दिलेला आनंद मोठा कि दुसऱ्याने आपल्याला दिलेला आनंद मोठा ह्याची आपण तुलनाच नको करु या. मात्र आपण दिलेल्या आनंदाला एक सोनेरी किनार असते. कारण ज्ञान जसे दिल्याने वाढते तसाच आनंदही दिल्याने वाढतो.

आनंदाचे सुद्धा छोटे. मोठे खूप प्रकार असतात. ते आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येवोत. आपण ठरवलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला खूप आनंद घेता येईल. मात्र तो आनंद घेण्याची इच्छा असली पाहिजे.

आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत आनंद पहा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा. आपल्याही आनंदात त्यांना सामील करुन घ्या. पण जास्त करुन दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बना. आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होतो हि कल्पनाच फार सुखद आहे. तसंच दुसऱ्याच्या दुःखातसहभागी व्हा. त्यांचं दुःख कमी होण्यासाठी, सुसह्य होण्यासाठी त्यांचं सांत्वन करा. मात्र काही झालं तरीही दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होऊ नका.

बघा, दुसऱ्याला आनंद द्या आणि जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद स्वतः मिळवा. आनंद द्यावा, आनंद घ्यावा, आनंद जीवनाचा विसावा.

श्री संत तुकाराम महाराजांच्या "आनंदाचे डोही आनंद तरंग.." ह्या अभंगाने केलेल्या लेखाच्या सुरवातीचा शेवट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे ह्यांच्या 'आनंदी आनंद गडे...' ह्या कवितेच्या पहिल्या दोन कडव्यांनी करावा असे मला मनापासून वाटते.

निसर्गावर मनापासून प्रेम करणारे 'बालकवी' म्हणतात, बघा आनंद कसा सगळीकडे भरला आहे.

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||

वरती खाली मोद भरे, 
वायूसंगे मोद फिरे 
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला 
मोद विहरतो चोहिकडे, आनंदी आनंद गडे || १ ||

सूर्यकिरण सोनेरी हे, 
कौमुदि ही हसते आहे 
खुलली संध्या प्रेमाने, 
आनंदे गाते गाणे 
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले 
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे  || २ ||

श्रीमती सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत - ऑगस्ट २०१५ 

No comments:

Post a Comment

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...