Monday 22 June 2020

वेळा




गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. पण वेळ यावी लागते. वेळ कधीही सांगून येत नाही. वेळेचा सदुपयोग करा. कालापव्यय करु नका. वेळेला खूप महत्व आहें. Time is Money. वेळ आयुष्यात फक्त एकदाच येते. "बखत पडा बाका तो गधे को कहना काका", "काळ आला होता पण वेळ आली नव्हती". गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. वेळेला महत्व द्या. आपली कामे ठरलेल्या वेळेनुसार करा. ठरलेल्या वेळेतच करा. कधीही विलंब लावून नका. उद्यावर तर ढकलूच नका. कारण आजचा उद्या उजाडल्याबरोबर आज होणार आहे. Tomorrow has no end. तेच "कल करे सो आज कर आज करे सो अब कर" आलेल्या सुसंधीचं स्वागत करा. यश तुमचंच आहे. अशा तऱ्हेची अनेक वाक्ये आपल्या कानावर नेहमीच पडत असतात. अन ते खरंही आहे. 

पण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात नियमितपणे येणाऱ्या मुख्य म्हणजे दररोज दोन वेळा खूप महत्वाच्या आहेत. १. सूर्यास्ताची संध्याकाळ व २. सूर्योदयापूर्वीच्या पहाट. दिवसाला निरोप देणारी आणि थोड्या वेळाने रात्रीला सुरुवात होईल असे सांगणारी एक वेळ असते. तिला करकरीत 'तिन्ही सांज' म्हणतात. सूर्य मावळण्याच्या बेतात असतो; तास अंधार पडलेला नसतो पण थोड्याच वेळात पडणार असतो. ना उजेड ना अंधार अशी ती वेळ असते. तिला संध्याकाळ म्हणतात. ती कातर वेळ असते. मनाला हुरहूर लावणारी, अस्वस्थ करणारी, उगाच जीव खाली वर करणारी, घरात कुणी आजारी असलं तर; छोटं बाळ असलं अन ते रडत असलं तर मनाला भेडसावणारी हि वेळ असते. ती आपण सुंदर, पवित्र कार्याची असते. आपण ती करु शकतो. १० देव्हाऱ्यातील देवाजवळ दिवा लावून, २) भगवंताचे स्तवन करुन...

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

तसंच

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।
संध्यादीपं नमोस्तुते । संध्यादीपं नमोस्तुते ।

हि त्रिवार प्रार्थना दिव्यासाठी आणि पुढील श्लोक भगवंताचे मनापासून स्तवन करण्यासाठी 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् |
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ||
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् |
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् || 

देवाजवळ सुगंधी उदबत्ती लावली कि, देवघरच काय संपूर्ण घरच पवित्र्याने भरुन जातं. एकदम प्रसन्न वाटतं. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, गृहिणी, अर्थार्जन करणारा घरातला करता पुरुष, घरातील बाल-गोपाळ मंडळी ह्या सर्वांना सांज वेळ सांगते - देवाचं नामस्मरण करा. मनात चांगले विचार आणा. स्वतःशी प्रामाणिक राहा. कुणाला फसवू नका. कुणाचेही वाईट चिंतू नका. मी कशीही असले तरी ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, तिच्या स्वागताला वास्तुपुरुष सजग असतो आणि तो तथास्तु म्हणतो आणि म्हणूनच देवाची मनापासून प्रार्थना करा. 
दिवसाला निरोप देणारी आणि रात्रीचे स्वागत करणारी ही संध्याकाळची वेळ फार महत्वाची असते, ती सर्वांना सांगते, "दिवसभर घरासाठी, प्रपंचासाठी श्रम करुन थकलेल्या माणसा, येणाऱ्या रात्री गाढ झोप. झोप येण्यासाठी, संपूर्ण विश्रांती घेण्यासाठी, दुसरे दिवशी ताजे-तवाने होऊन नव्या दमाने प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठी तू ह्या तिन्ही सांजेला दिवसाच्या २४ तासातले ५ मिनिटे देवासाठी दे. देवाची आठवण कर. एकदा देवघरातील सर्व देवांकडे डोळे भरुन पाहुनघे आणि नंतर शांतपणे डोळे मिटून देवाला हात जोडून अगदी निरिच्छ मनाने काहीही न मागता मनापासून नमस्कार कर"

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, माँ कश्चिद् दुःख माप्नुयात॥

हे तू घरी, बाहेर, ऑफिसमध्ये, प्रवासात, बागेत कुठेही करु शकतो. परमेश्वराची फक्त आठवण करायची. जशी छोटं बाळ ज्या निरागसतेने आपल्या आईची करते अगदी तशीच. 

तसंच रात्रीला निरोप देऊन येणाऱ्या दिवसाचं उत्स्फूर्त स्वागत करणारी सुद्धा एक वेळ असते तिला पहाट म्हणतात, पहाटेची वेळ माणसाला नवीन झालेली असते. सूर्योदय झालेला नसतो. नुकतीच उजाडायला सुरुवात झालेली असते. बाहेर प्रसन्न वातावरण असतं. पहाट-वारा मंद वाहत असतो. पक्षांना जाग आली असते. फुलंही उमलू लागतात. रात्र नुकतीच संपलेली असते. पहाटेचा झुळूझुळू वाहणारा वारा शरीराला नवी उभारी देतो. माणसाचं मन प्रसन्न करतो. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची झोप उजाडण्यापूर्वीच पूर्ण झालेली असते. ते आपल्या शय्येवरच उठून बसतात. देवाला आळवतात. भूपाळी व भजनं म्हणतात. त्यांच्या गोडं वा कशाही आवाजाने संपूर्ण घर पवित्र्याने भरुन जातं. देवळामध्ये घंटानाद होतो. देवळाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सेवक नामस्मरण करीत साफसफाईला सुरुवात करतात. थोड्याच वेळात देवाला उठविण्यासाठी काकड आरतीला सुरुवात होते. सगळीकडे प्रसन्न आणि पवित्र वातावरण असतं. आईच्या कुशीत झोपलेल्या तान्ह्या बाळालाही जाग येते. ते चुळबुळ करुन रडका आवाज काढून आईला जगवतं. त्याची भूक भागल्यावर ते हातपाय हालवित स्वतःच्या मनाशीच खेळत असतं. हॉ, ऊ असे कसले तरी आवाज मोठ्याने काढायचा प्रयत्न करीत आईच लक्ष आपल्याकडे वेधून घेतं. आई तृप्त होऊन त्याच्याकडे बघत असते. 

आता घरातले सगळेच उठायच्या तयारीत असतात. त्यांनाही आपापल्या कामाला लागायचे असते. ही सकाळची वेळ खूप शुभ व प्रसन्न असते. तिच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. ती म्हणते, "बाबा रे, आता सूर्योदय होईल, गृहिणी सडासंमार्जन करुन घरातल्या कामाला सुरुवात करतील. करता पुरुष, वडीलधारी माणसं, मुलं, बाळ सगळीच आपापल्या कामाला लागतील. पण हे सगळं करायला मी तुम्हाला शक्ती दिली आहे हे लक्षात ठेवा. ह्याची जाणीव ठेवा. तुमची सगळी कामे आटोपून तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला माझा विसर पडलेला असेल. पडू दे विसर, चालेल मला. पण माझं आत्ता, ह्यावेळी एव्हढंच मागं आहे कि, अशा ह्या प्रसन्न वेळी सुद्धा ज्याने सृष्टी निर्माण केली त्या विधात्याला तुमचे आणखी ५ मिनिटे द्या. जो हे जाग चालवतो त्याच स्मरण करा. आआपलेच दोन्ही कर जुळवून त्याचे दर्शन घेऊन त्यात वास करणाऱ्या देवतांचे मनापासून स्मरण करा. 

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले । 
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥

तसेच सर्वेत्र सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामय:। हीच प्रार्थना पुन्हा एकदा देवाला करुन दिवसाची सुरुवात करा. तुमचा दिवस नक्की चांगला जाईल. बाकी संसारात, अडीअडचणी येतच असतात अन संपूनही जातात. सुखदुःखाचे चक्र चालूच असते. ते विधीलिखीतच आहे. पण ह्या दोन महत्वाच्या वेळेसाठी दिवसातले १० मिनिटे द्याच. कदाचित तुमचा देवावर विश्वास नसेल सुद्धा किंवा असेलही. पण सायन्स कितीही पुढे गेले असले तरी जन्म मरणाची दोरी आपल्याच हातात ठेवणाऱ्या त्या महान अदृश्य शक्तीपुढे म्हणजे परमेश्वरापुढे नतमस्तक व्हाच. मग त्याला तुम्ही देव, निसर्ग, नियती, विश्वचक्र किंवा  एखादी शक्ती असे काहीही म्हणा. 

तर अशा ह्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अगदी नियमितपणे येणाऱ्या महत्वाच्या दोन वेळा पहाट आणि सांज - काळाला अलगद पुढे सरकवणाऱ्या ! 

श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी 
७५१७२८१६३९ 
अभिनीत मे - २०१५ 

(कृपया लेखावर कमेंट करतांना शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा हि विनंती )

17 comments:

  1. अतिशय सुंदर लेख . सर्वसामान्य लोकांना चांगल्या जीवनशैलीसाठी उद्दुक्त करणारा लेख . एवढेच नव्हे तर एखाद्या निराशाग्रस्त व्यक्तीला नैराश्यावर मात करण्यासाठी मार्ग सुचविणारा लेख .
    छान ! अभिनंदन !!
    विजय कुळकर्णी . बंगलोर .

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. वेळेचे महत्त्व विशद करणारे सुंदर शब्दांकन

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  3. आवर्जून सगळया गोष्टी करायच्या असं ठरवलं मी हा लेख वाचून ...संजीवनी देशपांडे सातारा

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! महिन्याभरानंतर आपण आपला अनुभव जरूर लिहा.

      Delete
  4. खुप छान,विचारपूर्वक रोज आवर्जुन करायच्या गोष्टीचा विचार मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  5. अतिशय सुंदर आणी छान अस लेखन आईनी केल आहे ही नवीन पिढीला अमृत व संस्कार आहे गं.भा.आईंना सा.नमस्कार.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कृपया लेखाच्या शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा. त्यासाठीच हे लेख ब्लॉग स्वरूपात लिहीत आहे.

      Delete
  6. फार छान . वेगळ्याच पद्धतीने सोप्या भाषेत सुंदर विचार मांडले आहेत . 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कृपया लेखाच्या शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete
    2. वेळेचा सदुपयोग यावर आधारित प्रेरणादायी सुंदर लेख..मनिषा चौधरी.

      Delete
  7. ताईंनी लिहीलेला वेळेचे. महत्त्व हा लेख खुप आवडला आणि त्या त्या वेळेनुसार करावयाचे संस्कार याची महती पटली एकदम छान लेख आहे सौ पद्मजा गेंगाणे

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर आणी छान अस लेखन आईनी केल आहे

    ReplyDelete
  9. वेळेचा सदुपयोग कसा करावा, याचं स्मरण करुन दिल्याबद्दल

    धन्यवाद. संस्क्रृत श्लोकांचा मराठीत अर्थ दिला तर बरं वाटेल.

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर विश्लेषण.. आणि समर्पक लेखन.. वेळेचे महत्व.. परिवारातील प्रत्येकाने कटाक्षाने पाळलेच पाहिजे.. आईंचे अनुभव प्रेरणादायीच. धन्यवाद!
    - रत्नेशकुमार ओमप्रकाश पाण्डेय - जळगाव

    ReplyDelete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...