Thursday 28 May 2020

मनात आलं लिहिलं : आनंद


आनंदाचे डोही | आनंद तरंग
आनंदाची अंग | आनंदाचे || धृ ||
काय सांगो झाले | काहीचिया बाही
पुढे चाली नाही आवडीने || १ ||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथील जिव्हाळा तेथे बिंबे || २ ||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखी आला || ३ ||

तुकाराम महाराजांचा हा अभंग जेव्हा आपण लतादीदींच्या मधुर आवाजात रेडिओ किंवा दूरदर्शनवर ऐकतो तेव्हा आपणसुद्धा आनंद-विभोर होऊन जातो.

ह्या अभंगात आनंद अगदी ठासून भरला आहे. कुठे अगदी मुंगी जायला सुद्धा जागा नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, "विठ्ठला, असं काही तरी झालं आहे; सांगताही येत नाही अन समजतही नाही. खूप आनंद झाला आहे. ह्यापेक्षा दुसरा मोठा आनंद असूच शकत नाही. आईच्या गर्भात राहायला मिळाले ह्याचा की, मिळणाऱ्या मातृत्वामुळे लाभणाऱ्या आईपणाचा. काय झाले तेच कळत नाही. विठूमाऊली तू मला तुझ्यात सामावून घेतले. मी तुझा झालो अन मी जे अनुभवले तेच माझ्या मुखातून बाहेर आले." विठ्ठल भक्तीतून मिळणारी अनुभूति हा संत तुकारामांचा आनंद आहे. 

ह्या अभंगाचा अर्थ मी माझ्या अल्पमतीनुसार लावला आहे. संत तुकोबांना तो तास अभिप्रेत असेल किंवा नसेलसुद्धा. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांना वेगळेच काही म्हणावयाचे असेल. तरी त्यांना हा आनंद विठ्ठलाच्या अगदी जवळ गेल्यामुळे प्राप्त झाला आहे. एवढे मात्र खरे.

आपण काही तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाई, मुक्ताईसारख्या साधुसंतांची उंची गाठू शकत नाही. त्यांचा आनंद भगवद प्राप्तीचा आहे. तरी पण आपण आनंदातला आनंद नक्कीच समजू शकतो; कारण आनंद - आनंदच असतो.

आपण सामान्य लोक. आपले आनंद वेगळे - वेगळे म्हणजे प्रपंचातले. परीक्षेत मिळालेलं यश-मिळालेलं घवघवीत यश. उत्तम नोकरी, मानमरातब, पैसा, अनुरूप मिळालेला नवरा, मनासारखी मिळालेली बायको, मुलं होणं, त्यांना मोठं करण्याचा आनंद, त्याला संस्कारक्षम करणं, शिक्षण देणं, त्याची नोकरी, ज्याला आपण आपल्या गरजा कमी करून प्रसंगी पोटाला चिमटा देऊन, आपल्या सर्व हौशी बाजूला सारून मोठं करतो अन जेव्हा आपण आपलं अपत्य सर्वार्थानी सक्षम आणि सुसंस्कारित झालेलं पाहतो;  तेव्हाचा आपला आनंद सुद्धा खूप मोठ्ठा असतो. तो आनंद आपल्या तारुण्यातल्या फलश्रुतीचा असतो. ज्याला आपण मोठं केलं, वाढवलं त्यांनी मनापासून आपल्या उतारवयात बायको-पोरांसकट आपल्यावर प्रेम करणं, आपली काळजी घेणं, आपल्याला हवं, नको बघणं, आपण त्यांना हवे असणं, हे सर्व त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या अनुभवाला येणं, हा म्हातारपणातला सर्वात मोठ्ठा आनंद असतो. 

आणि मग आपल्या मुलांची मुलं, त्यांची मुलं, पुन्हा तेच चक्र. मुलांना घडवणं, त्याच अपेक्षा. तोच आनंद. तर असे आपले आनंद. आनंद छोटा असो व मोठा असो, श्रीमंत वा गरीब माणसांचा असो, अगदी मुक्या  प्राण्यांचा का असेना, आनंद आनंदच असतो. कोणाला कशात आनंद वाटेल तर कोणाला कशात आनंद वाटेल ! पण आपल्याला वाटणारा आनंद एकदम स्वच्छ व सर्वांना आनंद देणारा असावा. त्याने दुसरा कुणीही दुःखी होऊ नये. दुसऱ्याचं नुकसान होऊन आपला मात्र फायदा व्हावा हे आपल्या आनंदाचं स्वरुप कधीच नसावं. 

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 

5 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद ! आपले नाव शेवटी लिहिल्यास प्रतिक्रिया कोणाची आहे ते कळेल.

      Delete
    2. सुंदर अगदी माझ्या लहानपणी आई गिरण्या नदीवरून पाणी आणून त्यात शेण मिसळून सडा टाकून झाल्यावर रांगोळी काढली. समोरच राम मंदिर होते,आरती झाल्यावर,भटजी झोळी घेऊन निघत व १० घरी भिक्षा मागून त्याचा उदय निर्वाह करत मंदिरास दानाची जमीन होती तिचे उत्पन्न येई . सायंकाळी भटजी आम्हास पाढे शिकवत पालखी,निमकी,पाउणकी,सवायकी दिडकी औटकी शिवाय सायं प्रार्थना.नंतर आरती होई.
      राम नवमीला राम मंदीरापासुन ते हनुमान मंदिर नदीच्या काठावर दोन किलो मिटर ते लोटांगण घालीत दर वर्षी.फारच सुंदर दिवस होते आज ६२ वर्षे झाली मी ६९ वर्षांचा पण आजहि ते संस्कार मनापासून पळतो.
      मोहन काशिनाथ खैरनार.जळगाव.मुळ गाव मेहुणबारे.येथील प्रासंगिक लिखाण केले.

      Delete
  2. शेवटचा पॅरा खूपच महत्त्वपूर्ण 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपले नाव शेवटी लिहिल्यास प्रतिक्रिया कोणाची आहे ते कळेल.

      Delete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...