Saturday 13 June 2020

नातं : मानलेलं


अशोक गेंगाणे माझा भाऊ आहे. पण मानलेला. त्याला मानलेला भाऊ का म्हणावं ? हेच मला समजत नाही. पण ह्या जन्मी तो माझा मानलेलाच भाऊ आहे. पुनर्जन्म आहे कि नाही मला माहित नाही आणि असलाच तर पुन्हा माणसाचाच जन्म मिळावा इतके आपण भाग्यवानही नाही; पण का कोणास ठाऊक तरीही मला असंच वाटतं कि, गेल्या जन्मी माझी आणि अशोकाची आई एकच असावी.  

साधारण ४५/४६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे बहुतेक १९६५-६६ साल असावं. माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी विदर्भातील मुर्तिजापूरची. धुळ्याला आले. पण इकडे खान्देशात आमचे कुणीही नातेवाईक नव्हते (आमचे म्हणजे माहेरचे) त्यामुळे मनात थोडी धडधडच असायची. फारसं करमायचं नाही. घरात आम्ही दोघे आणि दोन लहान दीर. एक ८ वीत अन एक ९ वीत शिकत असलेले... शिकायला म्हणून राहिलेले. घरी नेहमी ह्यांचे मित्र व भाऊजींचे मित्र येत असायचे. त्यातल्या त्यात धाकट्या भाऊजींचे म्हणजे विजुभाऊजींचे मित्र जास्त असायचे. ओळखी व्हायच्या, तेही वहिनी वहिनी म्हणून गप्पा मारायचे. त्यातच कोण कुठले ? मी कुठली ? अशी चौकशी व्हायची. तेवढाच वेळ छान जायचा. 

आणि एक दिवस अशोक गेंगाणे आले. त्याला सहजच मी विचारले, "तुम्ही कुठले ? ( सुरवातीला तो मला वहिनीच म्हणायचा)" ते म्हणाले, " मी अकोला जिल्ह्यातील दहिहंड्याचा." मला खूप आनंद झाला. तोपर्यंत मला विदर्भातील कुणी भेटलंच नव्हतं. मी म्हटलं, "बाप रे ! म्हणजे, तुम्ही विदर्भातले आमच्या अकोला जिल्ह्यातले." तो एकदम गप्पच झाला. त्याला वाटलं मी अकोला जिल्ह्यातील दहिहंड्याचा आहे, त्यात एवढं बाप रे म्हणण्यासारखं काय आहे ? मग मीच थोडं अजीजीने म्हणाले, " का हो मग सगळेच काय वहिनी म्हणता ? कुणी तरी पाठीशी राहा. तुम्ही मला ताई म्हणा" आणि तो सहजच म्हणाला, "चालेल" तेव्हापासून मी त्याची ताई झाले अन तो माझा मोठा भाऊ झाला आणि आजपर्यंत ते नातं 'मानलेलं नातं' अबाधित आहे. एवढा काळ लोटला तरी. 

तो नेहमीसारखा येत राहिला. राखी पौर्णिमेला राखी बांधून घ्यायचा. भाऊबीजेला ओवाळून घ्यायचा. शिक्षण झालं. त्याला नोकरीही लागली नंतर त्याच लग्न झालं बायकोही चांगली मिळाली. साधी, सरळ, सुस्वभावी, सगळ्यांशी जमवून घेणारी. तिनंही आमच्या भाऊ-बहीण नात्याचा मन राखला. येणं-जाणं वाढलं. आमच्या घरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांचा आधार असायचा. मदत असायची. एकमेकांच्या घरातील प्रत्येक कार्य प्रसंगात आम्ही आवर्जून सहभागी होत होतो, कार्याचा आनंद घेत होतो. त्याची दोन मुलं त्यांनीही आत्या म्हणून सुखावलं. माझी तीन मुलंही त्यांना तोंड भरून मामा, मामी म्हणून हाक मारतात. माझा भाऊ म्हणून ह्यांनाही अशोकचा सार्थ अभिमान होता. 

माझं कुटुंब तर मोठं होताच. पण त्यांचंही कुटुंब बऱ्यापैकी मोठंच होतं. पण त्याच्या व माझ्या कुटुंबीयांनी आम्हाला भाऊ बहीण म्हणून स्वीकारलं होतं. आम्ही एकमेकांकडे गेलो कि ' ताई आली रे किंवा मामा आला गं ' असं वाक्य कोणीही अगदी सहज म्हणायचं.

आता आम्हाला सुना आल्या. दोघांनाही नातवंड झाली अन तरीही आम्हा दोन्ही कुटुंबातील वागणं अगदी तसंच राहिलं, किंबहुना थोडं जास्त जवळच अन जास्तच आपुलकीचं झालं. माझ्या घराच्या कार्यात भाऊ म्हणून व त्याच्या घराच्या कार्यात माहेरवाशीण म्हणून अगदी मानाने वावरते. 

इतकंच काय आजच्या पिढीतील माझी मुलं, सुना आणि नातवंड मामा, मामी आले कि आनंदून जातात आणि त्यांची मुलं, सुना मला माहेरवाशीणच मानतात. तसेच नातवंड आत्या आजी म्हणून खूप खूप आनंद देतात. 
आजच्या एक या दो बच्चे काळात बहिणीला भाऊ व भावाला बहीण असणं म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. तरीही पण भाऊ नसलेल्या बहिणीला अशोक सारखाच मानलेला भाऊ मिळावा अशी माझी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.

(फोटो सौजन्य : सौ. ललितागौरी गेंगाणे)

श्रीमती सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत : ऑक्टोबर - नोव्हेंबर - २०११ (दिवाळी अंक) 

8 comments:

  1. वाह ,,मानलेलं नात कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळच असत

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete
  2. 👌👌👌👍👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete
  3. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! शेवटी नाव लिहिले तर कळेल...

      Delete
  4. जुन्या आठवणी आणि जुनी नाती यांना खरोखरच सोनेरी छटा असेच हे नक्कीच !

    ReplyDelete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...