आज 'मदर्स डे' ! तसं 'डे' हि संस्कृती आपण मानत नाही कारण आपण कायम कृतज्ञता मानणारे भारतीय... परंतु कुठेतरी सुरवात करायची म्हणून आजचा दिवस. माझी आई ति. सुनंदा कुळकर्णी हिने आजपर्यंत अनेक लेख व कविता लिहिल्या आहेत. "छोट्या छोट्या दोस्तांसाठी छान छान कविता" हा तिचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. माझ्यात लिखाणाचा गुण हा तिच्याकडून आलाय. तिने लिहिलेल्या लेखांचाही संग्रह करावयाचा मानस आहे. त्यासाठी तिचे यापूर्वीचे व सध्या लिहीत असलेले लेख आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा ब्लॉग सुरु केला आहे. मध्यंतरी लिखाण कमी करून तिने खूप साऱ्या रांगोळ्या काढल्या. सर्व प्रकारच्या... आणि मग एक दिवस रांगोळी हा लेख... या लेखापासून सुरुवात करतो. आपल्या सवडीनुसार प्रतिक्रिया द्या, तिचा फोन नंबर पण दिलाय, फोन करा !
देवाची उपकरणे घासली. समई लावली. पुजेची तयारी केली. इतक्यात आण्णा (माझे सासरे) म्हणाले, "पोरी, रांगोळी नाही काढली ?" मी ओशाळले. पटकन देवघरात जाऊन रांगोळी काढली. भारतीय संस्कृतीत रांगोळीचे खुप महत्त्व आहे. अंगणात सडा-रांगोळी, तुळशीजवळ रांगोळी आणि पुजेआधी देवाजवळ रांगोळी सर्वच मराठी घरात काढली जाते. सडा टाकल्यावर रांगोळी शिवाय अंगण तसेच ठेऊ नये असे म्हणतात ते अशुभ असतं. सणावारी, दसरा, दिवाळी, चैत्रगौर, संक्रांत, हळदीकुंकू समारंभ असला की, गृहिणी येणाऱ्याच्या स्वागतासाठी स्वच्छ अंगणात सुंदर, सुबक रांगोळी काढतात. रांगोळी काढणे ही सुध्दा एक कला आहे. येणारा क्षणभर थबकला पाहीजे. रांगोळी ठिपक्यांची असो, देखावा असो किंवा पानाफुलांची वा नवीन प्रकारचीं असु दे त्यात सौंदर्य असतेच. प्रसन्न वाटतं.
माझी आई म्हणायची, "आपण देवाजवळ ज्या पारंपारिक रांगोळ्या काढतो त्या अंगणात काढु नये. त्या रांगोळ्यांवर अंगणात चुकून पाय पडण्याची शक्यता असते. कोणी मुद्दाम देत नाही केव्हा लहान मूल खेळताना पुसल्या जातात म्हणून काढू नये. कारण आपण त्यांना देवा इतकाच मान देतो. पण तरीही अंगणात रांगोळी हवीच." आता फ्लॅट सिस्टिम मध्ये अंगणाचा प्रश्न असला तरी आपण दाराजवळ थोडी आगेमागे रांगोळी काढतोच. तर अशी ही रांगोळी. भारतीय संस्कृतीची, भारताची शान. भारतीय गृहिणीच्या हातातली एक सुंदर कला. आता पुरूषही रांगोळी काढतात.
कला ही कोणा एकाची मक्तेदारी नाहीच मुळी. लग्नकार्यात वा मोठ्या समारंभात रांगोळी काढायला कलाकारांना बोलावले जाते. आणखी काय हवं ? महत्त्वाचं राहीलचं. सणावारी वा एखाद्या शुभ-प्रसंगी सर्वांच्या जेवणाच्या ताटाभोवती रांगोळी काढतात. विविध प्रकारची.सुंदर, मोहक. पुर्णब्रम्ह असणारी अन्न-देवता तर प्रसन्न होतेच पण जेवणाराही खुष होतो आणि उदरभरण-यज्ञकर्म यथास्थित पार पडते आणि मग मनोबल आरोग्य, सुखासमाधानाची सहज वृध्दी होते. वास्तुदेवता मनापासून शुभाशिर्वाद देते, हर्षभरीत होऊन म्हणते, तस्थातु.
सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२ ८१६३९

No comments:
Post a Comment